नायगाव/साईनाथ कांबळे
नायगाव शहरात रहदारी वाढत आहे आणि अतिक्रमणाने विळखा घातला असून यात नव्याने अवैध धंदे जोम धरू लागले आहेत.क्रिकेट सट्टा,ऑनलाईन जुगार (लॉटरी) व गुटखा यासारख्या अवैध धंदे जोमाने चालत असल्याचे पहावयास मिळत आहे.
एकीकडे नायगाव शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवून शहरवासीयांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी प्रयत्नशील असलेले नायगाव पोलीस प्रशासन दुसरीकडे राजरोसपणे वाढत चाललेला मुख्य रस्त्यालगत ऑनलाइन जुगार (लॉटरी) कडे दुर्लक्ष करीत असताना दिसून येत आहे.
नायगाव शहरात ऑनलाईन लॉटरी सेंटर हा अवैध धंदा जोम धरू लागला आहे. परिसरातील नागरिक विविध कामानिमित्त शहरात येतात. मुख्य रस्त्यालगतच हा ऑनलाईन लॉटरी सेंटर असल्याने हव्याशी पोटी महत्वाचे कामे सोडून आपला मोर्चा इकडे वळवितात. यात जवळचे पैसे घालून निराश होऊन रिकामी हाताने घराकडे परततात यामुळे त्यांचे आर्थिक तथा मानसिक नुकसान होऊन कुटुंबात कलह निर्माण होत असताना पहावयास मिळत आहे.
नुकतेच नांदेड येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अशाच एका ऑनलाईन लॉटरी सेंटरवर रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यात नायगावात जुगार चालवणारा मोठा (डीलर) म्होरक्या यातून निसटला असल्याची सर्वत्र चर्चा चालू असताना तोच इसम नायगाव पोलिसाच्या नाकावर टिचून अजूनही बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरी सेंटर व मटका तथा क्रिकेट सट्टा चालवीत आहे. याकडे स्थानिक पोलिसांनी लक्ष देऊन कार्यवाही करणे अपेक्षित आहे.
महाराष्ट्र वार्ताने मागच्या अंकात प्रकाशित केलेल्या बातमीनुसार वरील लॉटरी सेंटरचा मालक त्याच्या मोबाईल सकट पोलिसाच्या हाती लागला तर नायगाव शहरात चालणारा मटका,जुगार, अवैध क्रिकेट सट्टा, याचा पर्दाफाश होण्यास वेळ लागणार नाही परंतु सदर इसमाच्या पाठीमागे मोठ्या राजकीय नेत्याचा हात असल्याचेही बोलले जात असल्याने नायगाव पोलीस यावर कार्यवाही करतील का? हा प्रश्न अभिज्ञ आहे.
एकीकडे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नायगाव च्या लगत असलेल्या पोलीस ठाणे रामतीर्थ येथे अशाच बेकायदेशीर ऑनलाईन सेंटरवर कार्यवाही करते आणि तालुक्याचे ठिकाण असणाऱ्या नायगाव शहरात ऑनलाईन लॉटरी सेंटर चे मोठे रॉकेट असल्याचे नागरिकात बोलत असताना याकडे दुर्लक्ष होत आहे हे स्थानिक पोलिसांच्या नजरेस येऊ नये हे नवलच!
खऱ्या अर्थाने अशा अवैध धंद्यामुळे नायगाव शहरालाच नव्हे तर या शहरांमध्ये राजकीय व सामाजिक नेतृत्व घडू पाहणाऱ्या साठी आव्हानात्मक बाब ठरणार आहे यामुळे यावर लवकर स्थानिक पोलीस प्रशासन तथा वरिष्ठांनी लक्ष देऊन संबंधितांना ताब्यात घेऊन त्याच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व नागरीकातून होत आहे.





