स्थायी आणि विषय समित्यांचे गठन रखडले
बिलोली
नगरपरिषदेचा सध्या हेवेदाव्यांचा कळस पाहायला मिळत असून, ‘स्थायी आणि विषय समित्यांच्या’ गठनासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष सभांना एका विशिष्ट गटाच्या नगरसेवकांनी जाणीवपूर्वक पाठ फिरवली आहे. या नगरसेवकांच्या गैरहजेरीमुळे सभेची गणपूर्ती (कोरम) होऊ शकली नाही, हि सभा व्यपगत झाल्याचे घोषित करण्यात आले.परिणामी शहराच्या विकासाशी संबंधित असलेल्या महत्त्वाच्या समित्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
नेमके प्रकरण काय? नगरपरिषदेच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी आणि विविध विभागांच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि पाणीपुरवठा यांसारख्या विषय समित्यांचे गठन होणे ‘महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम १९६५’ नुसार बंधनकारक आहे. मात्र, बिलोलीत एकाच गटाच्या १४ व इतर २ नगरसेवकांनी सभेला गैरहजर राहण्याचा पवित्रा घेतल्याने, या समित्यांची निवड प्रक्रिया रखडली आहे.
जनतेच्या प्रश्नांकडे पाठ शहरात सध्या स्वच्छतेचा प्रश्न गंभीर असून, अनेक प्रभागांमध्ये पाणीपुरवठ्याची समस्या आहे. या प्रश्नांवर चर्चा करून निर्णय घेण्याचे अधिकार या समित्यांना असतात. मात्र, जनतेने विश्वासाने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी सभागृहात येऊन काम करण्याऐवजी राजकीय अडवणूक करण्यातच धन्यता मानत असल्याचे चित्र दिसत आहे. बिलोली नगर परिषदेत ‘महाराष्ट्र नगरपरिषदा अधिनियम १९६५’ नुसार स्थायी व विषय समित्या गठित करण्यात यावी या गंभीर प्रकाराबद्दल पत्रकार व समाजसेवक सय्यद रियाज यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, त्यांनी मुख्याधिकारी बिलोली मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने जनआंदोलन करण्यात येईल असे इशारा दिला आहे.





