पोलीस मात्र बघ्याच्या भूमिकेत.
नायगांव/साईनाथ कांबळे
तालुक्यातील मोठे शहर असलेले नरसी हे गाव नेहमी चर्चेत असते. काल मुख्य चौकात नरसी येथील माजी सरपंच व विद्यमान सरपंच यांचे भाऊ यांच्यामध्ये जुन्या वादावरून तुंबळ हाणामारी झाली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला.
भिलवंडे परिवार गेल्या कित्येक वर्षापासून नरसी राजकारणामध्ये सक्रिय आहेत. व परिसरात त्यांची चांगली वलय आहे.मागे झालेल्या सेवा सोसायटी च्या निवडणूक दरम्यान भिलवंडे परिवारात दोन गट निर्माण झाले.तेथूनच या वादाला ठिणगी पेटली.
सोसायटी निवडणुकीचा निकाल सर्वश्रुत आहे.अतिशय नाट्यमय घडामोडी त्यावेळी घडल्या. निवडणुकी दरम्यान त्याही वेळी थोडा वेळ गदारोळ झाला होता. त्यावेळी चा एकमेकांच्या मनातील राग अजूनही शांत झाला नसल्याचे काल दिसून आले. एकमेकां समोर जात असताना शाब्दिक चकमकी चे रूपांतर तुंबळ हाणामारी मध्ये झाले. माजी सरपंच प्रतिनिधी यांचे मुख्य चौकात हार्डवेअरचे दुकान आहे. त्या ठिकाणी झालेल्या या तुंबळ हाणामारी चा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला. त्यामध्ये विद्यमान सरपंच गजानन शिवाजी भिलवंडे, गजानन पांडुरंग भिलवंडे यांच्यासह दोघांचेही भाऊ हातात लाकडे घेऊन हाणामारीला करताना दिसत आहेत विशेष म्हणजे पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी उभा टाकून निमुटपणे बघ्याची भूमिका घेताना दिसून आले. त्यामुळे त्यांच्या कार्यावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.
वृत्त लिही पर्यंत याबाबतीत पोलिस ठाण्यात कोणताही गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही. शेकडो नागरिक उपस्थित होते.एकाही नागरिकांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. उलट व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पाठवण्यात धन्यता मानले.तर दोन-तीन पोलीस कर्मचारी अगदी त्या भांडणाच्या मधोमध असूनही सोडवा सोडव तर केलीच नाही. उलट बघ्याची भूमिका घेतल्याने सोशल मीडियावर पोलिसांच्या कर्तव्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त करताना पाहावयास मिळत आहे.






