बिलोली/मारोती एडकेवार
तमलूर ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशी अहवालासंदर्भात अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रविंद्र मारोती फरसे यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती देगलूर यांना निवेदन देत चौकशी अहवाल चार महिन्यांपासून प्रलंबित असल्याचा आरोप केला आहे. संबंधित प्रकरणात विस्तार अधिकारी, ग्रामसेवक व सरपंच यांच्या संगनमताने आर्थिक देवाण-घेवाण झाल्यामुळे अहवाल दडपला जात असल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
तसेच वारंवार पाठपुरावा करूनही कोणतेही स्पष्ट उत्तर मिळत नसल्याने मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे फरसे यांनी नमूद केले आहे.
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून चौकशी अहवाल चार दिवसांत उपलब्ध करून द्यावा तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान, 25 मे 2026 रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करण्याचा इशाराही संबंधितांनी दिला आहे.






