“पीडितांवरच गुन्हे, आरोपी मोकाट; प्रशासन जातीवाद्यांना पाठीशी घालतंय” – गायकवाड यांचा आरोप
माष्टी/धर्माबाद, दि. 13 मे: माष्टी येथे प्रथमच भीम जयंती साजरी केल्याने बौद्ध वस्तीवर झालेल्या हल्ल्यानंतर पीडित तरुणांवरच खोटे व गंभीर गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते सुरेश दादा गायकवाड यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे.
काय आहे प्रकरण?
माष्टी येथील बौद्ध समाजाने यंदा प्रथमच गावात भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. मात्र याचा राग मनात धरून जातीवादी गटाने बौद्ध वस्तीवर हल्ला केला. विशेष म्हणजे पोलिसांनी हल्लेखोरांवर कारवाई करण्याऐवजी ज्या तरुणांवर हल्ला झाला त्यांच्यावरच क्रॉस केस करून खोटे व गंभीर गुन्हे दाखल केले.
संपूर्ण समाज वेठीस
गावात बौद्ध समाजावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला आहे. पीडित कुटुंबांना पिण्याचे पाणी बंद, गिरणीवर दळण बंद, दुकानातून माल बंद, रेशन बंद करण्यात आले आहे. गावाबाहेर जाण्यासाठी ऑटोमध्येही बसू दिले जात नाही.
सुरेश दादा गायकवाड यांचा प्रशासनाला इशारा
“ज्या तरुणांनी भीम जयंती साजरी केली त्यांच्यावरच खोटे गुन्हे टाकून त्यांचे आयुष्य बरबाद करण्याचा डाव आहे. प्रशासन उघडपणे जातीवाद्यांना पाठीशी घालत आहे. धर्माबादच्या तहसीलदार स्वामी मॅडम यांना विचारले की पाणी बंद असताना तुम्ही काय उपाय केले? त्यांना उत्तर देता आले नाही. कुंडलवाडी पोलीस स्टेशनचे API ज्ञानेश्वर शिंदे यांना जाब विचारला की पीडितांवरच केस कोणाच्या सांगण्यावरून केली? तेही निरुत्तर झाले,” असे सुरेश दादा गायकवाड म्हणाले.
प्रमुख मागण्या:
- माष्टी येथील बौद्ध तरुणांवरील सर्व खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत.
- हल्ला करणाऱ्या जातीवादी गुंडांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करावेत.
- सामाजिक बहिष्कार टाकणाऱ्यांवर कारवाई करून पाणी, रेशन, दळण सुरू करावे.
- प्रकरणाची चौकशी CID कडे द्यावी.
“गुन्हे मागे न घेतल्यास मंत्रालयासमोर आत्मदहन करू”
“माष्टीतील बौद्ध तरुणांवरील खोटे गुन्हे 8 दिवसांत मागे घेतले नाहीत, तर महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करू. गरज पडल्यास मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा देतो,” असे सुरेश दादा गायकवाड यांनी ठणकावून सांगितले.
यावेळी नंदकुमार बनसोडे, भास्कर भेदेकर, जे.पी. मिसाळे, जयपाल वाघमारे व स्थानिक भीमसैनिक उपस्थित हते





