वंचित-भीम आर्मीने रात्रभर ठिय्या मांडून गुन्हे दाखल करायला लावले; ऍट्रॉसिटी, विनयभंग, पोक्सो अंतर्गत FIR
धर्माबाद, नांदेड दि. ९ मे: मौजे माष्टी, ता. धर्माबाद येथे काल सायंकाळी काही गावगुंडांनी बौद्ध वस्तीवर हल्ला करून महिला व पुरुषांना अमानुष मारहाण केली. या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर आहे.
वंचित-भीम आर्मी घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्हा अध्यक्ष शंकर महाजन यांनी तात्काळ कुंडलवाडी पोलीस स्टेशन गाठले. त्यांच्यासोबत भीम आर्मीचे कि जिल्हा अध्यक्ष स्वप्नील भोसीकर, महासचिव हर्षवर्धन कांबळे, धर्माबाद तालुका अध्यक्ष कुलदीप मस्के, मारुती कांबळे तसेच माष्टी व परिसरातील शेकडो बौद्ध समाज बांधव उपस्थित होते.
रात्री ९ ते पहाटे ५ ठिय्या आंदोलन
आरोपींवर तात्काळ कारवाईच्या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी सायंकाळी ९ ते सकाळी ५ वाजेपर्यंत पोलीस स्टेशनसमोर ठिय्या मांडला. अखेर पोलिसांनी संबंधित गावगुंडांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 18, महिलांची छेडछाड, पोक्सो कायदा व गंभीर स्वरूपाची मारहाण या कलमांन्वये गुन्हा दाखल केला. FIR नोंदवल्यानंतरच कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन सोडले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य
या प्रकरणी ॲडिशनल एसपी अर्चना पाटील, डीवायएसपी पाटील, कुंडलवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी तात्काळ दखल घेत पूर्ण सहकार्य केले व दोषींवर गुन्हे दाखल केले.
“दलित-बहुजनांवर हल्ला करणाऱ्यांना माफी नाही. आरोपींना 24 तासांत अटक करा, पीडित कुटुंबांना पोलीस संरक्षण द्या.” – शंकर महाजन, जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
सध्याची परिस्थिती
माष्टी गावात तणावपूर्ण शांतता असून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जखमींवर धर्माबाद ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपींचा शोध सुरू आहे





