बिलोली प्रतिनिधी
बिलोली:-
तालुक्यातील हुंनगुंदा आणि नागणी परिसरात गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून अवैध रेती वाहतुकीने सीमा ओलांडली आहे. हुंनगुंदा व नागणी मांजरा नदी पात्रातून एकही शासकीय रेतीघाट मंजूर नसताना, रेती माफियांनी लोडरच्या साहाय्याने रात्रंदिवस धुमाकूळ घातला आहे. दररोज २० ते २५ हायवा गाड्यांमधून शेकडो ब्रास रेतीची चोरटी वाहतूक सुरू असताना, पोलीस प्रशासनाला मात्र दोनच गाड्या सापडल्या आहेत. त्यामुळे “पोलिसांना फक्त दोनच हायवा दिसले का? बाकीचे कुठे गायब झाले का ?” असा थेट आणि संतप्त सवाल हुंनगुंदा, नागणी, मणूर आणि संगम, बामणी येथील त्रस्त नागरिकांनी उपस्थित केला आहे.
केवळ 'दोन' वाहनांवर कारवाई बाकीचे पाठीशी का..?मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाया केल्या आहेत.
पहिली कारवाई:- दि. १६ मे २०२६ रोजी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास नागणी ते धर्माबाद रोडवर, हुनगुंदा गावासमोर ५०० मीटर अंतरावर एम एच १७ सी व्ही १५२० या क्रमांकाच्या हायवा वाहनाची तपासणी करून कारवाई करण्यात आली.
दुसरी कारवाई:- दि. २१ मे २०२६ रोजी सकाळी ७:०० वाजता नागणी ते संगम रोडवरील हुनगुंदा शिवारात एम एच ०४ जे यु २९७३ या क्रमांकाच्या हायवा वाहनावर अवैध रेती वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही 'धडक कारवाई' झाल्याचा डांगोरा पिटला जात असला, तरी या कारवाया केवळ नावालाच असल्याचे बोलले जात आहे. ज्या हुंनगुंदा आणि नागणी शिवारातून दररोज शेकडो ब्रास रेती धर्माबाद, कुंडलवाडी आणि बिलोलीकडे राजरोसपणे पाठवली जाते, तिथे पोलिसांना फक्त हे दोनच हायवा कसे काय दिसले, हा मोठा संशोधनाचा विषय बनला आहे.
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून स्थानिक नागरिकांनी अनेक निवेदने दिली, वृत्तपत्रांमधून सातत्याने बातम्या प्रसिद्ध झाल्या. तरीही मुख्य रेती माफियावर आणि लोडर मालकांवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. पोलीस प्रशासन केवळ एक-दोन गाड्या पकडून स्वतःची पाठ थापटून घेत असल्याचे चित्र आहे. स्थानिक रेती माफियांना नेमके कोणाचे अभय लाभले आहे? असा प्रश्न आता नागरिक उघडपणे विचारत आहेत.
एकीकडे शासन महसूल वाढीसाठी प्रयत्न करत असताना, दुसरीकडे बिलोली तालुक्यात मात्र शासकीय तिजोरीवर दिवसाढवळ्या दरोडा टाकला जात आहे. आता या धडक कारवाईनंतर पळून गेलेल्या इतर हायवा गाड्यांवर आणि त्यांच्या पाठीशी असणाऱ्या मुख्य सूत्रधारांवर पोलीस प्रशासन कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.



