साईनाथ कांबळे
तालुक्यातील मेथी येथील शांताबाई सदाशिव हिवराळे यांच्या गट क्रमांक 81 मधील 61 गुंठे जमिनीवर गावातील काही लोकांना हाताशी धरून माजी सरपंच दत्ता फिरंगवाड यांनी बेकायदेशीर अतिक्रमण करून जमीन हडप करण्याचा केविलवाना प्रयत्न केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,मुखेड तालुक्यातील मौजे मेथी येथील श्रीमती शांताबाई सदाशिव हिवराळे यांचे पती सन 2007 ला आकस्मिक मरण पावले. तेव्हापासून त्यांनी आपल्या दोन मुलांना घेऊन त्यांच्या पतीच्या वडिलोपार्जित शेत गट क्रमांक 81 या शेतीमध्ये शेती करून उदरनिर्वाह करीत होते.
मागील काळात दुष्काळामुळे शेती उत्पन्नावर कुटुंबाचे उदरनिर्वाह भागत नसल्या कारणाने ते पुणे येथे कामास गेले होते. याचा फायदा घेत गावातील प्रल्हाद हिवराळे, बाबुराव हिवराळे,अशोक देसाई, रमेश देसाई, दिगंबर त्रिमुकदार, उमाकांत हिवराळे,देवराव शिंदे, रघुनाथ नालापल्ले,विश्वनाथ देसाई,कोंडीबा शिंदे, उमाकांत हिवराळे,गोपाळ शिंदे,कृष्णकांत शिंदे,तानाजी हिवराळे, गोविंद शिंदे, यांना हाताशी धरून माजी सरपंच दत्ता फिरंगवाड यांनी सदर विधवेच्या जमिनीवर दगड गोटे, जळतण व कच्चे घरे तयार करून अतिक्रमण केल्याने शेती मशागत करण्यास अडचण होत असल्याने शेतातील उत्पन्न शून्य होत आहे आणि दोन मुलांच्या लग्नासाठी काढलेले कर्ज यातून आर्थिक आणि मानसिक विवंचनेत अडकलेल्या या विधवा महिलेच्या कुटुंबियांना मानसिक त्रास होत आहे.
सदर अतिक्रमण तात्काळ हटवून आमची जागा मोकळी करून द्यावी.अन्यथा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी 19 फेब्रुवारी 2026 रोजी तहसील कार्यालय मुखेड या ठिकाणी आमरण उपोषण करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन तहसीलदार मुखेड, जिल्हाधिकारी नांदेड, पोलीस निरीक्षक मुखेड, यांच्याकडे सदर विधवेचा मुलगा रामदास सदाशिव हिवराळे यांनी दिनांक 12.फेब्रुवारी.2026 रोजी दिले आहे.
यावर वरिष्ठ अधिकारी काय कार्यवाही करतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.कारण अतिक्रमण धारकांना राजकीय वरदहस्त असल्याचे बोलल्या जात आहे.






