बिलोली
प्रतिनिधी :-
अटकळी (ता. बिलोली) :
नांदेड–हैदराबाद राज्य महामार्गावर अटकळी जिल्हा परिषद शाळेसमोर आज सकाळी सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास एका कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात कंटेनरमधील दोन जण जखमी झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.
प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, हैदराबादकडून नांदेडच्या दिशेने जाणारा कंटेनर भरधाव वेगात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले. त्यामुळे कंटेनर महामार्गाच्या कडेला जाऊन पलटी झाला. अपघात इतका भीषण होता की कंटेनरचा पुढील भाग पूर्णतः नुकसानग्रस्त झाला.
अपघाताचा जोरदार आवाज होताच अटकळी व परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. कंटेनरमध्ये अडकलेल्या जखमींना स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. त्यानंतर 108 रुग्णवाहिकेच्या सहाय्याने जखमींना त्वरित देगलूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या अपघातामुळे काही काळ नांदेड–हैदराबाद महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली.
वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे या मार्गावरील वेग नियंत्रण आणि वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनाने याबाबत योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.






