| बिलोली
बिलोली तालुक्यातील बामणी फिडर परिसरातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी २४ तास त्रिफेस वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सध्या मिळणारा केवळ ८ तासांचा अनियमित वीजपुरवठा शेतीसाठी अत्यंत अपुरा ठरत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
निवेदनानुसार सकाळी ०९:१० ते सायंकाळी ०५:१० या वेळेतच त्रिफेस वीज उपलब्ध होते आणि अनेकदा वेळेत बदल होतो. त्यामुळे मोटारी चालवून पिकांना आवश्यक तेवढे पाणी देता येत नाही. अतिवृष्टीमुळे जमिनीचा घट वाढला असून पिकांना अधिक पाण्याची गरज भासत आहे. अपुरा वीजपुरवठा हा शेतकऱ्यांसाठी गंभीर चिंतेचा विषय ठरत आहे.
शेतकरी वर्गाने बामणी फिडर व परिसरातील सर्व शेतकऱ्यांना २४ तास नियमित त्रिफेस वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे. मागणी तातडीने मान्य न झाल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या निवेदनावर गोविंद मारुती बदेवाड, माधव कुऱ्हाडे, माधव दिगांबर हांडे, बालाजी कुऱ्हाडे, लक्ष्मण मुंडकर, गोविंद पाटील, शिवराज संभाजी हांडे, संजय माधवराव पाटील,गौतम गावंडे, लक्ष्मण पुंजरवाड, नर्सिंग पुंजरवाड, बाबू पुंजरवाड, सायलू पुंजरवाड, नागोराव धाणेकर, बाबु धानेकर, शिवाजी बावलगावे अविनाश शंकर तोटेवाड,दरकाशे,देविदास दरकाशे, साईनाथ दरकाशे,आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाची प्रत कार्यकारी अभियंता, महावितरण विभाग देगलूर यांनाही देण्यात आली आहे.






