बिलोली प्रतीनीधी विलास शेरे
नांदेड जिल्ह्यातील लेंडी धरणग्रस्तांना अद्याप न्याय मिळत नसल्यामुळे रावणगाव (ता. मुखेड) येथील ६५ वर्षीय जैनोदीन पटेल रावणगांवकर यांनी न्याय मिळवण्यासाठी मंत्रालय मुंबईपर्यंत पायी चालण्याचा निर्धार केला आहे. आज त्यांच्या या न्याययात्रेचा दहावा दिवस असून सध्या ते इंदापूरच्या पुढे मुक्कामी आहेत.
लेंडी धरणाचे भूमिपूजन सन १९९६ साली झाले होते. मूळ अंदाजे ५६ कोटी रुपयांच्या खर्चातून सुरू झालेले हे प्रकल्प आज तब्बल २२०० कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. परंतु धरणग्रस्तांच्या अनेक मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. जिल्हा प्रशासन आणि धरणाचे कार्यकारी अभियंता तिडके यांनी एकाही गावाचे स्थलांतर न करता ०८ मे २०२५ रोजी तळभरणी व गळभरणीचे काम सुरू केले, ज्यामुळे पाण्याचा साठा जमा झाला.
तिडके यांनी दिलेल्या लेखी हमीपत्रात “१२ गावांना पाण्याचा धोका नाही” असे स्पष्ट नमूद होते. मात्र १८ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या अतिवृष्टीत रावणगाव आणि हासनाळ ही दोन्ही गावे पाण्याखाली गेली. या दुर्घटनेत हासनाळ येथील ६ नागरिकांचा मृत्यू झाला, तर शेकडो जनावरे वाहून गेली. अनेक कुटुंबांचे घर, शेतजमीन पूर्णतः नष्ट झाली असून काहीजण बेघर व उपाशीपोटी जीवन जगत आहेत.
घटनेला साडेतीन महिने उलटूनही धरणग्रस्तांना योग्य नुकसानभरपाई मिळालेली नाही. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांवर काहीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे जैनोदीन पटेल यांनी धरणग्रस्तांच्या १८ मागण्या घेऊन न्याययात्रा सुरू केली आहे. या मागण्यांमध्ये वाहतूक भत्ता, स्थलांतर भत्ता, स्वच्छ पुनर्वसन, इंदिरा आवास योजनेंतर्गत घरे बांधून देणे, तसेच वैयक्तिक घरांचा मावेजा देणे यांचा समावेश आहे.
प्रतिक्रिया
“जिल्हा प्रशासन आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. आम्ही राज्य शासनावर विश्वास ठेवतो. न्याय मिळावा म्हणून मी ३१ ऑक्टोबर २०२५ पासून पायी चालत मंत्रालय, मुंबईकडे निघालो आहे. माझे वय ६५ वर्षे असून, धरणग्रस्तांच्या हक्कासाठी मी अखेरपर्यंत लढणार आहे.”
जैनोदीन पटेल
या न्याययात्रेमुळे लेंडी धरणग्रस्तांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून, स्थानिक तसेच राज्य प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


