बिलोली ( विलास शेरे)
“समाजाकडून आपण सतत घेत असतो; परंतु त्याला परत देत नाही, ती एक प्रकारची चोरीच आहे. स्वतःपुरते जगणे हे पाप असून समाजासाठी जगणे हाच खरा कर्मयोग आहे,” असे प्रतिपादन श्री. सद्गुरु ज्ञानराजजी माणिकप्रभु महाराज यांनी केले. रविवार (ता२२) रोजी सगरोळी (ता. बिलोली) येथे संस्कृती संवर्धन मंडळाचे संस्थापक कर्मयोगी के. ना. तथा बाबासाहेब देशमुख यांच्या जन्मशताब्दी समारोप कार्यक्रमात ते आशीर्वादपर भाषणात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन प्रमोद देशमुख, जन्मशताब्दी महोत्सव समितीचे प्रमुख अरविंद देशमुख उपस्थित होते.
बाबासाहेबांकडे जमीन, मान-सन्मान व संपत्ती सर्व काही होते. ते इच्छित असते तर पुण्यासारख्या ठिकाणी राहून आपल्या कुटुंबाला सर्व सुखसोयी देऊ शकले असते; परंतु त्यांनी समाजाचे देणे लागतो ही जाणीव ठेवून सगरोळीसारख्या दुर्गम भागात शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला आणि अनेकांचे आयुष्य घडविले. बाबासाहेबांमध्ये ऋजुता, साधेपणा आणि निरागसता होती. कोणताही दिखाऊपणा नव्हता. लहान मुलांप्रती त्यांना विशेष प्रेम होते. मुलांमधील निरागसता ओळखून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य त्यांच्या शिक्षणासाठी समर्पित केले. “ही संस्था म्हणजेच बाबासाहेबांचे जिवंत रूप आहे,” असेही त्यांनी नमूद केले. यावेळी मंत्रोच्चारात बाबासाहेब देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण व बाबांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या “कर्मयोगी बाबासाहेब देशमुख” स्मरणिकेचे प्रकाशन झाले.
विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांचा जीवनप्रवास नाटिकेतून जिवंत केला, यावेळी उपस्थितांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक, माजी विद्यार्थी व संस्थेचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






