मुंबई: राजधानी मुंबईत आज विविध सामाजिक संघटनांच्या प्रमुख प्रतिनिधींची आज एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. ‘एपस्टीन फाईल्स’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव समोर आल्याचा आरोप आणि त्यातून निर्माण झालेली देशाची सुरक्षा व सार्वभौमत्वापुढील आव्हाने, यावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या गंभीर परिस्थितीत आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मुंबई येथील बैठकीत प्रामुख्याने देशाची सार्वभौमत्वता कशी अबाधित राखली जावी आणि एपस्टीन फाईल्समध्ये नाव आल्यामुळे मोदी कशा प्रकारे ‘ब्लॅकमेल’ होऊन हे करार करत आहेत, या सर्व मुद्द्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच माजी लष्करप्रमुखांच्या पुस्तकात आलेल्या काही धक्कादायक संदर्भांवरून देशाच्या संरक्षण धोरणांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. बाह्य शक्तींच्या दबावाखाली झुकून निर्णय घेतल्यास देशाचे सार्वभौमत्व धोक्यात येऊ शकते, असे मत देखील प्रतिनिधींनी यावेळी मांडला.
या महत्त्वाच्या आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर देशातील प्रमुख विरोधी पक्ष उदासीन असल्याची टीका बैठकीत करण्यात आली. जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि देशाला वस्तुस्थिती सांगण्यासाठी आता सामाजिक संघटनांनी कंबर कसली असून, या संघर्षाचे नेतृत्व ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
या बैठकीत केवळ चर्चा न करता आगामी आंदोलनाची दिशाही निश्चित करण्यात आली आहे. लवकरच या मुद्द्यावरून मोठे जनआंदोलन छेडले जाण्याचे संकेत देण्यात आले आहेत. या महत्त्वपूर्ण बैठकीला वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर, मुंबई प्रदेश प्रवक्ते अंबरसिंह चव्हाण यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





