बिलोली
बिलोली तालुक्यातील मौजे चिटमोगरा येथील शेतकरी त्र्यंबक देवाले यांच्या शेतामध्ये साठवून ठेवलेल्या हरभऱ्याच्या ढिगाला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्याचे आर्थिक हाल झाले आहेत. गावात अशा प्रकारची ही तिसरी घटना असल्यामुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, त्र्यंबक मलबा देवाले यांनी आपल्या गट क्रं. १७१ मधील ८० आर जमीनीत मेहनतीने पिकवलेला हरभरा काढणी करून शेतात ढिग करून ठेवला होता. मात्र अंदाजे सायंकाळी ०८:०० च्या वेळी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्या ढिगाला आग लावली. आग लागल्याचे लक्षात येईपर्यंत मोठा साठा जळून खाक झाला होता. ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.
गावकऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत संबंधित दोषी व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. वारंवार अशा घटना घडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
दरम्यान, पीडित शेतकऱ्याला तहसील प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांसह शेतकरी वर्गातून जोर धरत आहे. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा द्यावी, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.





