.नरसी/ प्रतिनिधी
रामतीर्थ पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दशरथ खंडेराव जांभळीकर आणि एका खाजगी व्यक्तीवर दिनांक 25 नोव्हेंबर रोजी उशिरा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंद केला आहे. रामतीर्थ पोलीस ठाण्यात दिनांक 21 नोव्हेंबर रोजी सात लोकां विरुद्ध जुगार खेळल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता.या गुन्ह्यातील एका आरोपीस अटक करून पोलीस कस्टडी अर्थात पीसीआर मागणार नाही यासाठी ए.एस.आय जांभळीकर यांनी दहा हजार रुपये लाच मागितले असल्याचे निष्पन्न झाले. लाचखोर पोलीस सोबत काम करणारा एक खाजगी व्यक्ती नामे अमजद पठाण यांनी तक्रारदारांशी संपर्क साधून मला तीस हजार रुपये दिले असते तर तुमचे सर्व गुन्हे मी अंगावर घेतले असते जांभळीकर साहेबांना सांगतो तक्रारदार (जुगारातील आरोपी) येत आहे त्यांना पैसे देऊन टाका असे सांगत लाच देण्यास प्रवृत्त केले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिनांक 22 नोव्हेंबर रोजी पडताळणी केली आणि यामध्ये जांभळीकर लाच मागितल्याचे पंचासमक्ष उघड झाले. यामुळे दिनांक 23 व 24 नोव्हेंबर रोजी एसीबी ने सापळा रचला हे जांभळीकर यांना संशय आल्याने जांभळीकर लाच स्वीकारण्यास नकार दिला. परंतु सुरुवातीला करण्यात आलेल्या पडताळणीत लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने एसीबी च्या वतीने भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अंतर्गत कलम ७, ७अ, आणि १२ नुसार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत दोन्ही आरोपीच्या घराची झाडाझडती चालू होती. रामतीर्थ पोलीस ठाण्यात टॉप टीप राहणे व मी किती कर्तव्याशी एकनिष्ठ आहे हे दाखवण्याचा नेहमी प्रयत्न करणारा पोलीस अधिकारी म्हणून जांभळीकर यांनी परिसरात प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला परंतु अति शहाणा त्याचा बैल रिकामा या उक्तीची प्रचिती आज स्वतःसह एका खाजगी व्यक्तीला एसीबीच्या जाळ्यात अडकवून सिद्ध केले. जांभळीकर यांच्या रामतीर्थ बीट मध्ये अनेक दिवसापासून चालू असलेला जुगार हे त्यांच्या वरिष्ठाच्या मर्जीने चालतो असे ही ते सदर कारवाही दरम्यान बोलण्याची चर्चा आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी बिलोली यांनी काल परवा नायगाव पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या रातोळी येथील जुगार अड्ड्यावर कार्यवाही केल्याने यास आळा बसेल असे वाटत होते परंतु रामतीर्थ पोलीस ठाण्यांतर्गत लोहगाव बिट मध्ये जुगार जोमाने चालू असल्याची खात्रीशीर माहिती आहे. लोहगाव बीट अंतर्गत एका शेतात मोठ्या प्रमाणात जुगार चालू असल्याची चर्चा बीट मध्ये आहे बीट जमादार हे वरिष्ठाच्या आदेशान्वये अर्थपूर्णरित्या मूग गिळून गप्प असल्याचे लोहगाव परिसरातील नागरिक बोलून दाखवत आहेत. यावर वरिष्ठ पोलीस अधिकारी काय कार्यवाही करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कार्यवाहीमुळे परिसरातील लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत हे मात्र निश्चित.






