प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात;
देगलूर प्रतिनिधी
देगलूर:- तालुक्यातील वझरगा ते तुपशेळगाव या मार्गावर सध्या काटेरी झाडे आणि झुडुपांनी साम्राज्य पसरवले असून, हा रस्ता वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाढलेल्या या झाडीमुळे समोरील वाहन दिसतच नाही. ज्यामुळे भीषण अपघाताची शक्यता वेळोवेळी निर्माण होत आहे.
तुपशेळगाव हद्दीत अनेक ठिकाणी अगोदरच जीवघेणी वळणे आहेत. त्यात काटेरी झुडपे इतकी वाढली आहेत की, समोरून येणाऱ्या भरधाव वाहनाचा अंदाजच येत नाही. नजर चुकी दुर्घटना घटी या म्हणीप्रमाणे दुचाकीस्वारांना आणि पादचाऱ्यांना अनेकदा या झुडुपांचा गंभीर अपघातासह मार सहन करावा लागत आहे. तसेच, विरुद्ध दिशेने वाहन आल्यास बाजूला होण्यासाठी जागाच उरली नसल्याने वाहन कडेला उभे करणेही कठीण झाले आहे.
विद्यार्थी आणि नागरिकांचे हाल
या मार्गावरून शाळेत जाणारे विद्यार्थी आणि दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. झुडुपांमुळे रस्ता अरुंद झाला असून, रात्रीच्या वेळी तर प्रवास करणे म्हणजे आपले जीव मुठीत घेऊन चालण्यासारखे झाले आहे.
“प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन रस्त्यावरील काटेरी झुडपे तात्काळ तोडावीत. कोणतीही जीवितहानी होण्यापूर्वी हा मार्ग मोकळा करण्यात यावा,” अशी आग्रही मागणी तुपशेळगावमधील नागरिक आणि विद्यार्थ्यांनी केली आहे. शिवाय जोपर्यंत अपघात किंवा घटना घडत नाही तोपर्यंत प्रशासनाची डोळे उघडत नाहीत अशीच आज पर्यंत भूमिका राहिली आहे म्हणूनच की काय इथे सुद्धा अपघातातून एखाद्याचे जीव गेल्याशिवाय प्रशासन काम करणार नाही की काय? असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.
आता चेंडू सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दरबारात असून, सार्वजनिक बांधकाम विभाग चेंडू कशा पद्धतीने टोलवेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासन मोठ्या अपघाताची वाट न पाहत काटेरी झाडी व झुडपांची व्यवस्था तात्काळ करण्यात यावी. अशा मागणीने जोर धरला आहे.





