अंत्यविधीलाच अडथळा, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
बिलोली
बिलोली तालुक्यातील आळंदी (ता. बिलोली) येथे मागास व बौद्ध समाजासाठी शासनाने निश्चित केलेल्या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर काही शेतकऱ्यांनी बेकायदेशीर अतिक्रमण करून गंभीर स्वरूपाचा अडथळा निर्माण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या अतिक्रमणामुळे केवळ दैनंदिन वाहतुकीसच नव्हे, तर अंत्यविधीसारख्या अत्यंत संवेदनशील आणि धार्मिक विधींनाही मोठा अडथळा निर्माण होत असल्याने गावात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या अन्यायकारक प्रकाराविरोधात आळंदी येथील सर्व मांग व बौद्ध समाज बांधवांनी दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी उपजिल्हाधिकारी, बिलोली यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, स्मशानभूमीकडे जाणारा हा रस्ता पूर्वापार वापरात असून सार्वजनिक मालकीचा आहे. मात्र, करडे मारोती खांबिका व करडे किशन नामदेव या दोन शेतकऱ्यांनी कोणताही कायदेशीर अधिकार नसताना सदर रस्त्यावर अडथळे उभे करून समाजबांधवांना स्मशानभूमीकडे जाण्यापासून रोखले आहे.
या प्रकरणातील आणखी गंभीर बाब म्हणजे संबंधित शेतकऱ्यांकडून समाजबांधवांना उघड धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
“आजपासून या रस्त्यावरून प्रेत नेले तर परिणाम भोगावे लागतील,”
अशा शब्दांत दहशत निर्माण केली जात असल्याने गावातील वातावरण तणावपूर्ण बनले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
स्मशानभूमीचा वापर करणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क असून, त्या रस्त्यावर अडथळा आणणे म्हणजे मानवी हक्कांचे सरळ उल्लंघन असल्याची तीव्र प्रतिक्रिया समाजबांधवांकडून व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यास सामाजिक सलोखा बिघडण्याची गंभीर शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.
या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता कायमस्वरूपी खुला करावा, बेकायदेशीर अतिक्रमण त्वरित हटवावे तसेच दोषी शेतकऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम व जोरदार मागणी समाजबांधवांनी निवेदनाद्वारे केली आहे.
या तक्रारीच्या प्रती तहसीलदार बिलोली, उपविभागीय पोलीस अधिकारी बिलोली तसेच पोलीस उपनिरीक्षक, पोलीस स्टेशन रामतीर्थ (शंकरनगर) यांनाही देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, प्रशासनाने वेळीच ठोस व न्याय्य भूमिका न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समाजबांधवांनी दिला असून, आता या प्रकरणात प्रशासन काय निर्णय घेते याकडे संपूर्ण बिलोली तालुक्याचे लक्ष लागले आहे. यावेळी मारोती धर्मकरे, गंगाधर धर्मकरे, आनंदा धर्मकरे, मनोहर गवळे, देवराव गाडीवडे, माधव सोनकांबळे, उत्तम सोनकांबळे, सुरेश गवळे, उत्तम धर्मकरे, सचिन सोनकांबळे, प्रशांत गवळे, सचिन भेदेकर, राजेश सोनकांबळे, विजय शेळके, सूर्यकांत गायवळे, विश्वजीत गवळे, बाबू गाईवळे आदी लोकांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.





