नायगांव तालुका मराठी पत्रकार संघटनेचा मोलाचा निर्णय – मुलीच्या शिक्षणाची व कुटुंबाच्या जबाबदारीची घोषणा
नायगांव / साईनाथ कांबळे
नरसी येथील रहिवासी युवा शेतकरी व दैं प्रजावणीचे पत्रकार सुभाष संभाजी पेरकेवार (नरसीकर) यांच्या दुःखद निधनाने नायगांव तालुक्यातील पत्रकार बांधवांमध्ये शोककळा पसरली आहे. कर्जाच्या ओझ्यामुळे आलेल्या अडचणींना तोंड देताना त्यांचे अलीकडेच निधन झाले.
या दुःखद घटनेनंतर नायगांव तालुका मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने दि. २४ डिसेंबर रोजी नरसी येथील शासकीय विश्रामगृहात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रद्धांजली सभेत उपस्थित पत्रकारांनी मनोगत व्यक्त करताना सुभाष पेरकेवार यांच्या पत्रकारितेतील कार्याचा, सामाजिक जाणीवेचा आणि त्यांच्या साध्या, प्रामाणिक स्वभावाचा उल्लेख केला. सहकाऱ्यांशी असलेले आपुलकीचे नाते, शेतकरी प्रश्नांवरील त्यांची लेखणी आणि समाजासाठी असलेली तळमळ यांची आठवण काढताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
या प्रसंगी नायगाव तालुका मराठी पत्रकार संघटनेने एक अत्यंत महत्त्वपूर्ण व सामाजिक भान जपणारा निर्णय जाहीर केला. दिवंगत पत्रकार सुभाष पेरकेवार यांच्या मुलीच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी तसेच कुटुंबाच्या पुढील आवश्यक मदतीची जबाबदारी संघटना घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या निर्णयाचे उपस्थितांनी स्वागत करत संघटनेच्या या मोलाच्या भूमिकेचे कौतुक केले. या निर्णयामुळे केवळ एका कुटुंबाला आधार मिळाला नाही, तर पत्रकारितेतील माणुसकी, एकजूट आणि सामाजिक जबाबदारीचे दर्शन घडले अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. पत्रकार सुभाष पेरकेवार यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रातील एक संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्त्व हरपले असून त्यांच्या आठवणी सदैव सहकाऱ्यांच्या मनात जिवंत राहतील अशा शब्दांत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष जेष्ठ पत्रकार सुर्यकांत सोनखेडकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर लखपत्रेवार, तालुकाध्यक्ष लक्ष्मण बरगे, माजी अध्यक्ष गंगाधर पा भिलवंडे, सय्यद जाफर, गोविंद टोकलवाड, दिलीप वाघमारे, कैलास तेलंग, नागेश कल्याण, गंगाधर गंगासागरे, शेख आरीफ, शाम चोंडे, शेषेराव कंधारे, साईनाथ कांबळे, माधव बैलकवाड, देविदास सुर्यवंशी, सय्यद अजीम, किरण वाघमारे, हनुमंत चंदनकर, अंकुश गायकवाड, निळकंठ जाधव, प्रकाश महिपाळे, तानाजी शेळगावकर, चंद्रकांत पा पवार, माधव कोरे, माधव चिंतले, मारोती सुर्यवंशी, धम्मदिप भद्रे यांच्या सह अनेक जण उपस्थित होते.





