घरकुल लाभार्थ्यांकडून पैसे घेतल्याची अधिका-यांची कबुली
बिलोली
नायगांव पंचायत समितीवर सध्या प्रशासक असल्याने अधिकारी ‘हम करे सो कायदा या पद्धतीने कामकाज करत आहेत. भाजप-महायुती सरकार गोरगरीबांच्या हिताच्या अनेक योजना राबवत असताना नायगाव पंचायत समितीकडून मात्र या योजनांच्या हेतूला हरताळ फासला जात आहे.
आमदार श्री. राजेशजी पवार साहेब यांच्याकडे अनेक नागरिकांकडून पंचायत समितीचे अधिकारी घरकुल योजनेच्या लाभासाठी पैशांची मागणी करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याच अनुषंगाने काल सोमवार, दि. 27 ऑक्टोबर 2025 रोजी ‘भ्रष्टाचाराचं कुरण’ बनलेल्या नायगाव पंचायत समिती कार्यालयास सकाळी कार्यालयीन वेळेत त्यांनी भेट दिली.
ही सरप्राईज भेट अनेक अधिकाऱ्यांचं पितळ उघडं पाडणारी ठरली. वेळ होऊन देखील अनेक अधिकारी कामावर हजर नव्हते. अशा अधिका-यांच्या खुर्चीला हार घालून तसेच उशीरा आलेल्या अधिका-यांचा सत्कार करुन आमदार साहेबांनी त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करुन दिली.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसमोर आमदार साहेबांनी अधिका-यांना फैलावर घेताच इंजिनिअर व ऑपरेटर यांनी घरकुल लाभ देण्यासाठी ‘लाच’ घेतल्याची कबुली दिली.
आमदार साहेबांनी त्या सर्व अधिका-यांना कारवाईचा इशारा देत आगळीवेगळी अशी ‘भ्रष्टाचार न करण्याची’ शपथ देखील दिली.
“नायगाव तालुक्यातील सर्व शेतकरी बंधू-भगिनींना आम्ही वचन देतो की, आपल्या घरकुलांचे हप्ते मंजूर करण्यासाठी लाच स्वरुपात मी एक रुपयादेखील मागणार नाही, अशी मी शपथ घेतो.
घरकुल लाभ देण्याचे काम करण्याची जबाबदारी माझी आहे. हे काम करण्यासाठी मला शासनाकडून पैसे/पगार मिळतो. शासनाकडून मिळालेल्या पैशांमध्ये माझे घर चालते, त्यामुळे गोरगरीबांकडून मी लाच घेतली नाही तरीदेखील माझ्या पोटापाण्याला काही फरक पडणार नाही. मला जर हे मान्य नसेल, तर मी या नोकरीचा राजीनामा देईल.”
अशा स्वरुपाची शपथ सर्व अधिकाऱ्यांना दिली.
नायगाव पंचायत समितीमध्ये होणारा भ्रष्टाचार ही अत्यंत गंभीर बाब असून येत्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा प्रकर्षाने मांडणार असल्याचे देखील आमदार साहेबांनी सांगितले आहे.
आमदार श्री. राजेशजी पवार साहेबांच्या या झाडाझडती मुळे भ्रष्ट अधिका-यांचे धाबे दणाणले असून प्रशासनाला सुतासारखे सरळ करण्याचा हा बेधडक मार्ग सर्वसामान्यांच्या पसंतीस पडला आहे.
साहेबांच्या या कार्यपद्धतीची जनतेत सर्वत्र चर्चा असून, त्यांच्या या धाडसी कार्यपद्धतीची नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होत आहे.




