आमदार जितेश अंतापूरकर यांच्याकडे हस्तक्षेपाची मागणी
सगरोळी/गंजगांव प्रतिनिधी — सगरोळी व गंजगांव परिसरातील मांजरा नदीपात्रातून दिवस-रात्र मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. महसूल प्रशासनाच्या कथित आश्रयाखाली हायवा वाहनांद्वारे वाळूची खुलेआम तस्करी होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.
नदीच्या अस्तित्वालाच धोका
अवैध वाळू उपशामुळे सगरोळी ते गंजगांव या पट्ट्यात नदीपात्रात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून पाण्याची पातळी लक्षणीयरीत्या खाली गेली आहे. परिणामी विहिरी व बोरवेल कोरड्या पडण्याची भीती निर्माण झाली आहे. आधीच उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या नागरिकांपुढे वाळू माफियांच्या कारवायांमुळे मांजरा नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दररोज ३०० ते ४०० जेसीबी व हायवा वाहनांचा आवाज परिसरात घुमत असतो. चेकपोस्ट असूनही वाळू तस्करी बिनधास्त सुरू असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मंडळ अधिकारी धुळगुंडे यांचं अर्थपूर्ण दूर्लक्ष
व स्थानिक प्रशासनाचा यामध्ये सहभाग असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
आमदारांनी लक्ष घालावे
मांजरा नदी ही सगरोळी, गंजगांव व येसगी परिसरातील शेतकऱ्यांची जीवनवाहिनी मानली जाते. त्यामुळे नदीचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी आमदार जितेश अंतापूरकर यांनी तातडीने तहसील कार्यालय, बिलोली येथे लक्ष घालून अवैध वाळू उपसा थांबवावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषींवर कडक कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
“नदी जगली तर आपण जगू; वाळू तस्करी थांबली नाही तर भविष्यात पाण्यासाठी वणवण करावी लागेल,” असा इशारा नागरिकांनी दिला आहे.





