देगलूर | प्रतिनिधी
देगलूर तालुक्यात अवैध रेती उत्खनन आणि क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे नागरिकांचे जीवन अक्षरशः धोक्यात आले असताना विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलना उपोषणा, करून सुद्धा प्रशासनाला घाम फुटत नसल्याने प्रशासन डोळेझाक केल्याचा गंभीर आरोप करत आता नागरिकांनी थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. “नाही चालेल… रेती माफियांची दादागिरी नाही चालेल!” अशा घोषणांनी तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
गेल्या तीन ते चार महिन्यांपासून वारंवार निवेदने देऊनही अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी येथील उपजिल्हाधिकारी देगलूर समोर उपोषण करीत असताना सुद्धा महसूल, पोलीस आणि आरटीओ प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने रेती माफियांचे धाडस वाढले आहे. शासनाच्या नाकाखालीच नियमांचे उल्लंघन करून क्षमतेपेक्षा जास्त रेती भरून वाहतूक केली जात आहे. परिणामी रस्त्यांची अक्षरशः वाट लागली असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे संतप्त जनतेतील सुजान नागरिकांनी रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन करणार असल्याचे ठरविले आहेत.
आंदोलनाची ठिकाणे व तारखा नुकताच जाहीर करण्यात आले आहे.
नागरिकांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार टप्प्याटप्प्याने रस्तारोको आंदोलन छेडले जाणार आहे:
८ मे २०२६ (शुक्रवार) – बोरगाव
११ मे २०२६ (सोमवार) – मरखेल
१२ मे २०२६ (मंगळवार) – लोणी
१३ मे २०२६ (बुधवार) – बल्लूर फाटा
१६ मे २०२६ (गुरुवार) – दावणगिर
या वरील ठिकाणी हजारो नागरिक एकत्र येऊन क्षमतेपेक्षा जास्त रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांना थांबवून प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.या आक्रमक आंदोलनाचे नेतृत्व श्री जेजेराव पाटील शिंदे (संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष) आणि श्री मच्छिंद्र गवाले (मानवी हक्क अभियान जिल्हाध्यक्ष, नांदेड) हे करत असून त्यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे की, “जनतेचा संयम संपला आहे; उपोषणकर्ते उन्हातानात तळमळत उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसले आहेत. याचा काही परिणाम होणार नाही हे जनतेच्या लक्षात आले आहे. या उपोषणकर्त्याला जाहीर पाठिंबा म्हणून आता कारवाई नाही तर संघर्ष अटळ आहे.”
नागरिकांच्या ठळक मागण्या
अवैध रेती उत्खनन तात्काळ बंद करावे, क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक दंडात्मक कारवाई करावी, खराब झालेल्या रस्त्यांचे तातडीने मजबुतीकरण करावे,रस्त्यावर साचलेली रेती हटवून अपघात टाळावेत, घरकुल लाभार्थ्यांना रेती मोफत उपलब्ध करून द्यावी, कारवाई झालेल्या वाहनांची संपूर्ण माहिती जाहीर करावी, महसूल यंत्रणा यांच्या निष्काळजीपणामुळे
रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पडणारी रेती, धुळीचे ढग आणि खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचे जीव धोक्यात आले आहेत. अनेक ठिकाणी मोटारसायकल घसरून अपघात होत असताना प्रशासन निष्क्रिय असल्याचा संताप व्यक्त होत आहे.
……………………………………..
प्रशासनाला अंतिम इशारा
नागरिकांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल आणि थेट शासन व प्रशासनाला जबाबदार धरले जाईल. महसूल, पोलीस आणि आरटीओ विभागाने तात्काळ संयुक्त कारवाई न केल्यास जनतेचा रोष अनियंत्रित होऊ शकतो.
देगलूरमध्ये उभा राहिलेला हा जनआक्रोश प्रशासनासाठी धोक्याची घंटा ठरत असून, आता तरी अधिकारी जागे होऊन माफियांवर कारवाई करतील का, हा मोठा सवाल उपस्थित होत आहे. या आंदोलनात परिसरातील लाखोच्या संख्येने नागरिक उपस्थित व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.





