केवळ २४ तासांत निविदा प्रक्रिया ; ४१६७ ब्रास वाळूचा लिलाव संशयाच्या भोऱ्यात
बिलोली (दयानंद भद्रे):
बिलोली तालुक्यातील सगरोळी-०१ येथील रेती गटाच्या लिलाव प्रक्रियेत प्रशासनाने सर्व नियम धाब्यावर बसवून फेर लिलाव केल्याचा आरोप निवेदनाद्वारे केले आहे. तब्बल ४१६७ ब्रास वाळू साठा असलेल्या या गटाचा फेर लिलाव करण्यासाठी२६ व २७ मार्च रोजी फक्त बातमी देऊन आजच प्रक्रिया उरकून घेण्याचा प्रयत्न प्रशासनाने केल्याने खळबळ उडाली आहे.
सगरोळी येथील रेती गटासाठी यापूर्वी काढलेली लिलाव प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. नियमानुसार, फेर-लिलाव करताना किमान ७ ते १५ दिवसांची जाहीर प्रगटण देणे बंधनकारक असते. मात्र, बिलोली उपविभागीय कार्यालयाने या नियमाला हरताळ फासला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या लिलावाची बातमी आज, २६ व २७ मार्च रोजीच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली आणि आजच लिलाव प्रक्रिया राबवण्यात आली. केवळ काही तासांचा अवधी देऊन हा लिलाव कोणाच्या फायद्यासाठी केला जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.अनामत रकमेत मोठी तफावत
यापूर्वीच्या नोटीसमध्ये अनामत रक्कम केवळ १०,००० रुपये ठेवण्यात आली होती. मात्र, अचानक दुसऱ्या नोटीसमध्ये ही रक्कम वाढवून ३,००,००० रुपये करण्यात आली. इतक्या कमी वेळात सामान्य कंत्राटदारांना ३ लाख रुपये जमा करणे आणि कागदपत्रांची पूर्तता करणे अशक्य आहे. हा बदल केवळ ठराविक ‘मोठ्या’ कंत्राटदारांना फायदा पोहोचवण्यासाठीच केल्याचा आरोप तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते तथा समाज सेवक सय्यद रियाज आणि शेख पाशा भाई गादीवाले यांनी केला आहे.शासनाचा कोट्यवधींचा महसूल धोक्यात असून
४१६७ ब्रास वाळू म्हणजे करोडो रुपयांचा व्यवहार आहे. जर या लिलावात पुरेशी स्पर्धा झाली नाही, तर हा गट मूळ किमतीतच कंत्राटदाराच्या घशात जाईल. यामुळे शासनाच्या तिजोरीचे मोठे नुकसान होणार आहे. प्रशासनाने पारदर्शकता पाळले नाही , संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून तात्काळ कारवाही करण्यात यावी.
या भ्रष्ट कारभाराविरोधात तहसीलदार,उपविभागीय अधिकारी,जिल्हाधिकारी, नांदेड यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. जर ही लिलाव प्रक्रिया तात्काळ रद्द करून पारदर्शक पद्धतीने फेर-लिलाव केला नाही, तर उपविभागीय कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समाज सेवक सय्यद रियाज व पाशा भाई गादीवाले यांनी दिला आहे.






