देगलूर
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग याच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आज दिनांक 07 मार्च 2026 रोजी मौजे.खानापूर येथे आयोजित करण्यात आले होते. अधिकाऱ्यांची तत्परता व नागरिकांनी दिलेला प्रतिसाद यामुळे शिबिर अत्यंत यशस्वी झाले. शिवाय ज्या उद्देशाने शिबिर ठेवण्यात आले होते ते अत्यंत यशस्वी ठरल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. सदरील शिबिर हे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या प्रेरणेने व उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, देगलूर तहसीलदार भरत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली खानापूर येथे आयोजित करण्यात आले. सदरील कार्यक्रमांतर्गत विविध प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच प्रलंबित फेरफार व जीवंत सातबारा उपक्रमांतर्गत झालेल्या नवीन सातबाराचे व फेरफार नकलांचे वाटप करण्यात आले. तसेच पुरवठा विभागाअंतर्गत नवीन राशन कार्ड ची वाटप करण्यात आले. सगायो व श्रावण बाळ योजनेअंतर्गत नवीन लाभार्थ्यांची अर्ज मंजूर करून त्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तसेच उपविभागीय अधिकारी व तहसीलदार अकृषक संदर्भात लोकांना मार्गदर्शन केले. तसेच जुने कृषक जमिनीबाबत झालेल्या लोकांना प्रीमियम भरण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तसेच लोकांच्या अडीअडचणी जाणून त्या सोडवण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या. महिला बचत गटाच्या लाभार्थ्यांना कर्ज वाटप बाबत सदरील समाधान शिबिरात मान्यता देण्यात आली. कृषी विषयक वेगवेगळ्या योजना तसेच ॲग्री स्टॅग संदर्भात मार्गदर्शन करून AI विस्तार ॲप बाबा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. आयसीडीएस विभाग अंतर्गत बेबी किटचे वाटप करण्यात आले. तसेच ग्राम विकास विभागामार्फत घंटागाडीचे उद्घाटन करण्यात आले. कृषी विभागांतर्गत एक ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले.महिला व बाल विकास अंतर्गत ज्या महिलांचे लाडके बहिण योजनेचे केवायसी प्रलंबित होते त्या संदर्भात स्टॉल लावून केवायसी करून घेण्यात आल्या. सदरील कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, देगलूर तहसीलचे तहसीलदार सूर्यवंशी, गिरीश सरकलवाड, नायब तहसीलदार रायावर , तालुका आरोग्य अधिकारी रमेश गवाले, सहाय्यक गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी सोनकांबळे, खानापूरचे मंडळ अधिकारी बालीपोंगल एस एम, खानापूरचे ग्राम महसूल अधिकारी तोटेवाड पी.एल., तडखेल ग्राम महसूल अधिकारी कापसे आर जी, सर्व मंडळ अधिकारी व तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते. आसपासच्या ग्रामस्थांच्या रेंगाळत असलेल्या प्रकरणांना तात्काळ निकाली लावल्याने सर्व नागरिकांकडून कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाल्याचे बोलले गेले.





