*देगलूर राज्य उत्पादन शुल्क निरीक्षकास निलंबित करण्याच्या मागणीने धरला जोर
बिलोली दयानंद भद्रे
मौजे खानापूर तालुका देगलूर येथील इंदिरा आवास नगर येथे सध्या अवैध व बेकायदेशीर रित्या शिंदि व दारू विक्री होत असल्याची तक्रार नागेश पलपवार व संबंध गावकऱ्यांनी गावातील नागरिकांच्या साह्यानिशी जिल्हाधिकारी नांदेड, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नांदेड, उपजिल्हाधिकारी देगलूर,तहसीलदार देगलूर व निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क देगलूर, यांना दिली आहे. अवैधरित्या होत असलेल्या सिंधी व दारूमुळे इंदिरा आवास नगरमध्ये अनेकांनी आपली जीव गमावली असल्याची उदाहरणे आहेत. शिवाय या सिंधी व दारूमुळे या भागातील अनेक परिवार उघड्यावर येऊन संसार देशोधडीस लागली असल्यानेच ही तक्रार देत असल्याचे तक्रारदाराने सांगितले आहे. इंदिरा आवास हा अगदी गरीब व रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगार वर्गाचा भाग आहे. दिवसभर राबराब काम करून मिळालेल्या पैशातून दारू व सिंधी प्राशन करीत असल्याने परिवार अनेक वेळा उपाशीपोटी झोपत असल्याने सर्व नागरिकांनी एकत्रित येऊन नागेश पलपवार यांच्या नेतृत्वात दारू व सिंधी तात्काळ बंद करण्यासंदर्भात तक्रार दिली आहे. तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदार देगलूर यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग देगलूर यांना पत्र दिले. मात्र निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क देगलूर यांनी सदरील पत्रास केराची टोपली दाखवत जाणून बुजून कार्यवाहीसाठी बनवाबनवी करीत असल्यानेच असल्याचेही तक्रारदाराने बोलून दाखवले आहे. लोकांच्या जीवापेक्षा यांना आपला हप्ता महत्त्वाचा असल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच की काय कार्यवाहीसाठी टाळाटाळ करीत आहे अशी संतप्त प्रतिक्रिया इंदिरा आवास नगर येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. दारू व सिंधी चालकावर कार्यवाहीस टाळाटाळ करणाऱ्या निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क देगलूर यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच तात्काळ कार्यवाही न केल्यास दिनांक 09/03/2026 रोजी उपविभागीय कार्यालय देगलूर समोर आमरण उपोषणास बसणार असल्याचेही तक्रारदाराने सांगितले आहे. प्रशासन कार्यवाही करून नागरिकांना न्याय देईल की आपला हप्ता वाचवण्यात यशस्वी होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





