महसूल- पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी – शिवराज रायलवाड, ज्ञानेश्वर शिरगिरे यांचे निवेदन
बिलोली, दि. ८ मे: नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील मौजे हुंनगुंदा येथून दररोज २० ते २५ हायवाच्या साह्याने रात्रंदिवस अवैधरित्या रेतीची चोरी सुरू असल्याची गंभीर तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
निवेदनात काय म्हटले आहे?
शिवराज लक्ष्मणराव रायलबाड आणि ज्ञानेश्वर बाबू शिरगिरे यांनी उपविभागीय अधिकारी, बिलोली यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हुंनगुंदा येथील रेती घाटाचा लिलाव झाला असूनही त्या ठिकाणी एकही ब्रास रेती उपलब्ध नाही. तरीही दररोज हजारो ब्रास रेतीची हायवाने चोरटी वाहतूक होत आहे.
प्रशासनावर गंभीर आरोप
या अवैध रेती चोरीकडे बिलोली तालुक्याचे महसूल प्रशासन, मंडळ अधिकारी, तलाठी तसेच कुंडलवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. लिलाव झाल्यापासून आतापर्यंतचे सर्व फोटो पुरावे म्हणून उपलब्ध असल्याचेही अर्जदारांनी म्हटले आहे.
या अधिकाऱ्यांना प्रतिलिपी
सदर निवेदनाच्या प्रती महसूल मंत्री बावनकुळे, जिल्हाधिकारी नांदेड, विशेष पोलीस उप महानिरीक्षक नांदेड व तहसीलदार बिलोली यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.
तात्काळ कारवाईची मागणी
या रेती माफियांवर कठोर कारवाई करून अवैध उत्खनन थांबवावे व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.





