बिलोली (गौतम गावंडे)
तालुक्यातील मौजे गागलेगाव जि. नांदेड) येथील ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक 02 – सर्वसाधारण महिला या रिक्त जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सौ. रुक्मिनबाई लालू वैजाळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. ग्रामपंचायतीच्या इतिहासातील ही पहिलीच बिनविरोध पोटनिवडणूक ठरली आहे.
सदर जागा कै. गंगुबाई साहेबराव कामोले यांच्या निधनामुळे रिक्त झाली होती. या जागेसाठी ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या वतीने सौ. रुक्मिनबाई लालू वैजाळे आणि सौ. प्रतीक्षा पिराजी कमळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
मात्र, सौ. प्रतीक्षा कमळे यांनी आपला अर्ज माघारी घेतल्याने सौ. रुक्मिनबाई वैजाळे या एकमेव उमेदवार राहिल्या आणि त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. विरोधी पक्षाला उमेदवार न मिळाल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली. या निमित्ताने सरपंच सौ. उषाताई आनंदराव जिंके यांच्या निवासस्थानी सौ. रुक्मिनबाई वैजाळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, युवक वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान, तहसील कार्यालयामार्फत आज या बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली.




