नांदेड,(गौतम गावडे)
प्रतिनिधी
शहरातील श्रीनगर परिसरात लिंगायत समाजाचे कार्यकर्ते सोनू कल्याणकर यांच्या भरदिवसा सार्वजनिक ठिकाणी झालेल्या निर्घृण हत्येने संपूर्ण नांदेड शहर हादरले असून या घटनेच्या निषेधार्थ संतापाची लाट उसळली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
अलीकडील काही दिवसांपासून नांदेड शहर व जिल्ह्यात गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अवघ्या सुमारे ७० तासांच्या कालावधीत पाच खुनांच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यापारी, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिक असुरक्षिततेच्या छायेत जीवन जगत असल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर श्रीनगर परिसरातील ही हत्या अधिकच धक्कादायक ठरली आहे. सोनू कल्याणकर हे लिंगायत समाजातील सक्रिय, तरुण व लोकप्रिय कार्यकर्ते होते. त्यांनी रक्तदान शिबिरे आयोजित करणे, गरजू नागरिकांना मदत करणे, विद्यार्थ्यांना सहकार्य करणे अशा विविध सामाजिक उपक्रमांतून आपली ओळख निर्माण केली होती. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे समाजात शोककळा पसरली असून राज्यभरातून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे.
दरम्यान, या हत्येमागे संघटित गुन्हेगारीशी संबंधित घटकांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पीडित कुटुंबाच्या सुरक्षेबाबतही गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
या घटनेच्या निषेधार्थ प्रा. मनोहर धोंडे, अॅड. अविनाश भोसीकर, रामदास पाटील सुमठाणकर, संजयअप्पा बेळगे, शिवाभाऊ नरंगले, बवनभाऊ बारसे, गंगाधरराव वडूरे, शंकर महाजन आदी मान्यवरांनी पोलिस महानिरीक्षक, नांदेड यांना निवेदन सादर केले आहे.
या निवेदनात खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत:
हत्येतील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी
प्रकरणाची विशेष दखल घेऊन फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवावा
पीडित कुटुंबास तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे
खटला प्रभावीपणे लढण्यासाठी अनुभवी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करावी
निवेदनात इशारा देण्यात आला आहे की, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास लिंगायत समाजाला लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील.
दरम्यान, या घटनेनंतर शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून तपास यंत्रणा सक्रिय झाली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.
नांदेडमधील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होत असून, या प्रकरणातील कारवाईकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.






